जिलेट ची कहाणी


अनेक प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा " माझं नशिबच खोटं " म्हणून आयुष्यात निराश होणाऱ्या माझ्या शेकडो मित्रांना आजची पोस्ट समर्पण.

किंग क्यांप जिलेट हा काही कोणी शास्त्रज्ञ नव्हता. तो होता एका कंपनीत काम करणारा २१ वर्षाचा एक तरुण सेल्समन. घरोघरी फिरून तो विविध प्रकारच्या वस्तू विकायचा. पण त्याच्या डोळ्यात मात्र भव्य स्वप्नं असायची. एक दिवस आपण असा एखादा शोध लावायचा कि संपूर्ण जगात आपलं नाव होईल आणि आपल्याला चिक्कार पैसेही मिळतील. परंतु एका सामान्य माणसासाठी ते एक अशक्य कोटीतलच स्वप्नं होतं. तरीही जिलेट आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करीतच राहिला. तब्बल २८ वर्षांनी त्याला यश मिळालं तेव्हा जिलेट हे नाव तब्बल दोनशे देशातील लाखो करोडो लोकांना ठाऊक झालं होतं. वयाच्या ७७ व्या वर्षी १९३२ मध्ये त्याचे निधन झाले तरीही आज ८० वर्षानंतर जिलेट हे नाव जिलेट ब्लेड, जिलेट सेफ्टी रेझर, जिलेट ट्वीन ब्लेड, जिलेट ट्रिपल ब्लेड, जिलेट शेविंग क्रीम, जिलेट ब्रश म्हणून जगातील अब्जावधी लोकांच्या ओठावर रोजच असते. २००५ मध्ये प्रोक्टर एंड ग्याम्बलने जिलेट कंपनी ५७ बिलिअन डॉलरला म्हणजे तब्बल ३ लाख ४२ हजार कोटी रुपयांना खरेदी केली तरी जिलेट हे नाव कायम ठेवले. किंग क्यांप जिलेटच्या त्या अफाट स्वप्नाला, त्याच्या त्या अविश्वसनीय चिकाटीला माझा त्रिवार सलाम !

दिवसभर सेल्समन म्हणून पायपिट केल्यानंतर फावल्या वेळात जिलेट काहीतरी संशोधन करत असे. (तुम्ही फावल्या वेळात क्रिकेट बघता ) त्याने तसे बारीक सारीक अनेक शोध लावले. पण त्यापासून त्याला चार पैसे काही गाठीला बांधता आले नाहीत. त्याचं संशोधनाचं ते वेड पाहून एक दिवस त्याच्या मालकाने त्याला एक असा सल्ला दिला कि तू असं काही शोधून काढ कि ज्याची गरज लोकांना रोजच पडेल आणि ते ती वस्तू वापरून फेकून देतील अन त्याला चांगला व्यवसाय करता येईल. त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. रात्रंदिवस तो अशी कोणती वस्तू असेल हाच विचार करू लागला. त्यासाठी त्याने असंख्य वेळा डिक्शनरी चाळून काढली. एकदा नेहमी प्रमाणे हातात वस्तरा घेऊन तो दाढी करत होता. अचानक त्याला एक सुंदर कल्पना सुचली. रोज घासून घासून वस्तऱ्याला धार लावत बसण्यापेक्षा आठवडाभर वापरून फेकून देता येईल असे ब्लेड तयार करता येईल का ? त्याला पकडता येईल असे रेझर बनवता येईल का ? त्या कल्पनेने जिलेटला झपाटून टाकलं. त्या दिवसांपासून त्याने अनेक तज्ञ व्यक्तीना भेटायला सुरुवात केली. प्रत्येकाने त्याच्या कल्पनेला वाटण्याच्या अक्षता लावल्या. तरीही जिलेट खचला नाही. आपली कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा त्याचा विश्वास थोडाही डगमगला नाही. त्याने आणखी पाच वर्ष अनेक तज्ञांच्या गाठी भेटी घेतल्या. शेवटी वयाच्या ४६ व्या वर्षी एकाने त्याला हवे तसे ब्लेड बनवून दिलेच. तेव्हा जिलेटला आकाशाला गवसणी घातल्याचा आनंद झाला.

पण त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण मोठ्या प्रमाणावर अशी ब्लेड बनविण्यासाठी त्याच्याकडे भांडवलच नव्हतं. कर्ज काढून त्याने एक मशीन बनवलं तेव्हा इतका खर्च झाला कि तो अक्षरशः कर्जबाजरी झाला. देणेकरी त्याच्या मागे लागले. मित्र त्याच्या रेझरवरून त्याची टिंगल करू लागले. शेवटी एका गुंतवणूकदाराने त्याला कर्ज रोखे काढायचा सल्ला दिला आणि कमी किमतीत स्वतः कर्जरोखे खरेदी करून त्याला भांडवल दिले. जिलेटने मोठ्या प्रमाणावर ब्लेड आणि रेझरची निर्मिती केली. पण त्याची ही कल्पना लोकांना आवडली नाही. फक्त ५० ब्लेड आणि रेझर विकली गेली. तेव्हा त्याने आपल्या प्रोडक्टचे पेटंट रजिस्टर केले. आणि बाजारात तुफान जाहिरात करून हजारो दुकानात आपले प्रोडक्ट विकायला ठेवले.
बघता बघता लाखामध्ये विक्री होऊ लागली. एका देशातून दुसऱ्या देशात करता करता जगातील दोनशे देशातील अब्जावधी लोकांना त्याच्या त्या सुंदर कल्पनेने भुरळ घातली. आणि त्याने एका मागून एक अशी ब्रश, क्रीम, सोप अशी प्रोडक्ट बाजारात आणली. त्याच्या प्रत्येक प्रोडक्टचा दर्जा इतका उच्चा होता कि त्यानंतर अनेक कंपन्यांनी आपली प्रोडक्ट बाजारात आणून त्याला शह द्यायचा प्रयत्न केला, पण जिलेट म्हणजे जिलेटच हवं अशी मागणी करणाऱ्या ग्राहकांमुळे जिलेटने आभाळालाच गवसणी घातली. वयाच्या ४९ व्या वर्षी आपलं स्वप्न साकार करणाऱ्या जिलेटची कहाणी आयुष्यात लवकर निराश होणाऱ्या लाखो तरुणांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारी ठरावी.

Post a Comment

Previous Post Next Post